चांगली संगत
चांगली संगत
हकीम लुकमान फार विद्वान व अनुभवी गृहस्थ होते. आपल्या अंतसमयी त्यांनी सर्व मुलांना बोलावून त्या वेळेस ज्या गोष्टी समजावून सांगायाच्या असतात त्या सांगण्यास सुरुवात केली. मुले लक्षपूर्वक ऐकत
होती. सर्व सांगून झाल्यावर हकीम गप्प राहिले. तेव्हा मोठ्या मुलाने विचारले, "पिताजी, अजून काही नाही ना?" "बाळ, आणखी फक्त एक शेवटची गोष्ट. समोरच्या पात्रात चंदनाची पावडर आहे. ती एका हातात आणि
दुसऱ्या हातात चुलीतील थोडासा कोळसा आण" सांगितल्याप्रमाणे मुलाने केले. "आता दोन्ही खाली टाकून दे." मुलाने परत वडिलांच्या आज्ञेप्रमाणे केले.
हकीम लुकमान म्हणाले, "बेटा, आता तुझ्या दोन्ही हातांचे निरीक्षण कर. चंदनचूर्ण खाली पडले तरी तुझ्या हाताला सुगंध देऊन गेले असेल. याउलट कोळसा निघून गेला तरी तुझा तो तळवा व बोटे यांना थोडेसे काळे करून गेला असेल, हेच मला तुम्हाला शेवटचे सांगायचे आहे."
"मी नाही समजलो" म्हणत मुलाने आपली मान नकार दर्शवत हलवली.
“चांगल्या लोकांची संगत चंदनासारखी असते. दुर्जनांची, वाईट माणसांची संगत कोळशासारखी असते." लुकमानने आपल्या सांगण्याचे मर्म मुलांना उलगडून दाखविले व शेवटचे डोळे मिटले. सत्संग व कुसंग यातील फरक सदैव लक्षात ठेवला तर जीवनाची चादर मलीन होत नाही. सत्संगाने माणसाला विवेक
प्राप्त होतो. विवेक हेच मनुष्याचे इतरांपासून असणारे वैशिष्ट्य किंवा निराळेपण आहे.
Nice
ReplyDelete