स्वातंत्र्ययुद्ध - परदेशी मालाचा बहिष्कार
स्वातंत्र्ययुद्ध - परदेशी मालाचा बहिष्कार
१९२२ मध्ये भारतात विदेशी वस्त्रांची होळी करण्याची मोहीम सुरू झाली. कोलकातामधील कापडाच्या व्यापाऱ्यांनी एक सभा आयोजित केली. सभेत बहुमताने या निर्णयास संमती देण्यात आली. एक व्यापारी मात्र श्री. मालवीयांकडे आला व म्हणाला, "यामुळे आमचे खूप नुकसान होईल."
मालवीयांनी त्याला स्पष्ट केले, "जो निर्णय झाला तो झाला. त्यात बदल होणे शक्य नाही. तुला पाहिजे तर तू विद्वान व कायदेतज्ज्ञ मोतीलाल नेहरू यांना भेट. ते तुझे समाधान करू शकतील."
व्यापारी मोतीलाल नेहरूंकडे गेला व त्यांना विनंती करू लागला, "आपण परदेशी मालाच्या होळीचा निर्णय एक आठवडा कृपया पुढे ढकला. माझ्याजवळ ७-८ कोटींचा विदेशी कपडा आहे. तो सर्व खलास झाला तर मी बरबाद होईन. आयुष्यातून उठेन."
मोतीलाल हसत म्हणाले, "बाबा रे, हे स्वातंत्र्ययुद्ध आहे. प्रत्येकाला त्यासाठी त्याग करावाच लागेल. माझे आनंदभुवन घर किती सुंदर आहे. मी ते माझ्या मुलासाठी बांधले. माझा मुलगा जवाहर तर जेलमध्ये आहे."
व्यापाऱ्याजवळ आता कोणतीच सबब नव्हती. तो म्हणाला, “ठीक आहे. आपण आजच सर्व विदेशी कपड्यांची होळी करा. मी स्वातंत्र्याचा साधक आहे. त्याला बाधक किंवा विरोधक असे माझ्याकडून काहीही घडणार नाही."
स्वातंत्र्याचे मंदिर जनतेच्या त्यागाच्या आधारशिलेवरच उभारले जाते.
***
Comments
Post a Comment