छान छान गोष्टी - हावरट कोल्हा
हावरट कोल्हा
एकदा जंगलात फिरत असताना कोल्ह्याला एक हत्तीचे शव सापडले. मांसाचा एवढा मोठा साठा सापडल्यामुळे कोल्ह्याला अतिशय आनंद झाला.
तो हत्तीच्या सोंडेवर चढला; पण हत्तीच्या सोंडेमध्ये अजिबात मांस नव्हते. मग त्याने हत्तीचे कान, शेपटी खाण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला मांस खायला मिळाले नाही. तो खूप वैतागला आणि हत्तीच्या आजूबाजूला फेऱ्या मारू लागला. शेवटी त्याला एक मार्ग सुचला त्याने हत्तीच्या पोटातच प्रवेश करण्याचे ठरवले. तो हत्तीच्या पोटातून शिरला. आता त्याची अनेक दिवसांच्या अन्नाची काळजी मिटली होती. त्याने विचार केला की आता या हत्तीवर कोणाची नजर पडली तर आपल्याला हे मास वाटून खायला लागेल आणि या अजस्त्र हत्तीला लपवणे देखील अशक्य आहे. त्यापेक्षा आपण हत्तीच्या पोटातच राहिलो तर आपली सगळी काळजी मिटेल मांसाच्या लोभाने कोल्हा हत्तीच्या पोटातच राहू लागला. अनेक दिवस झाले कडक उन्हाळा आला. उन्हामुळे हत्तीची कातडी सुकली आणि कोल्हा ज्या मार्गाने आत आला होता, तो मार्गच बंद झाला. कोल्हा खूप घाबरला आणि हत्तीच्या पोटात धडका मारू लागला. पण काही केल्या त्याला बाहेर पडता आले नाही. तो म्हणाला, 'मी किती मूर्खपणा केला! मांसाच्या लोभाने मी आज येथे अडकून पडलो आहे. मला माझ्या हावरटपणा ची शिक्षा मिळत आहे. काही दिवसानंतर पाऊस पडू लागला आणि हत्तीची कातडी भिजून पडली एके दिवशी कोल्हा ला प्रकाशाची एक तिरीप आत येताना दिसली. त्याला अत्यानंद झाला. त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता तो कसाबसा त्याच्या पोटातून बाहेर पडला आणि एकदाही मागे वळून न पाहता त्याने धूम ठोकली.
तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा हावरटपणा करु नये. आपल्याला जेवढे पाहिजे असेल तेवढेच घेणे. अति लोभामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो.
Comments
Post a Comment