संशोधक - जाॅन वालर
चला आज तुम्हाला थोड्या एका ‘हटके’ संशोधन आणि संशोधकाची गोष्ट सांगतो..
सामान्यतः संशोधक किंवा शास्त्रज्ञ म्हटला वाढलेली दाढी-लांब केशसंभार-डोळ्यांवर भिंगाचा चष्मा-अंगात लांब डगला-हातात पुस्तक आणि ‘प्रयोग’ म्हटलं की परिक्षानळ्या-चंचुपात्र-लॅब वगैरे असं चित्र डोळ्यांसमोर येतं पण वस्तूत: तसं काही नाही..
अनेक सरळासाध्या लोकांनी वरवर साधे वाटणारे अनेक संशोधन केलेत ज्यांनी आख्खं जग बदलून टाकलं..
पेटंट कार्यालायतील व्यवस्थापक असलेल्या जाॅन वालरनं छोटीशी पेपर क्लिप शोधली नसती तर?
कागदं गहाळ झाले असते-गैरसमज वाढले असते-मोठमोठ्या डिल्स गंडल्या असत्या,व्हिटकाॅम्बनं झिप शोधली नसती तर पॅंटपासून बॅगेपर्यंत सगळ्याचे वांदे झाले असते😅
सांगण्याचा मतितार्थ एवढाच की गुरुत्वाकर्षण-सापेक्षतावाद या मोठमोठ्या संशोधनापलिकडंही अनेक छोटे मोठे संशोधन-प्रयोग विज्ञान जगतात झालेत ज्यांनी मोठ्ठा इतिहास घडवला..
विज्ञानजगतातला ‘बॉलपॉईंट’ पेनचा शोध हा देखील कुठल्याही ‘क्रांती’पेक्षा कमी नाही..
जगातला असा कोपरा नाही जिथं ‘बॉलपॉईंट’ पेनचा वापर होत नाही..
बॉलपॉईंट पेनचा शोध आजपासून सुमारे आठ दशक आधी १९३१ साली लागला..
शोधकर्ता होता पुढं जाऊन लास’लो जोसेफ बिरो
नावानं प्रसिद्ध झालेला पुर्वाश्रमीचा लेडिस्लाओ जोस बिरो जाच्यावरून या पेनाचं नाव ठेवलं गेलं होतं ‘बिरो पेन’
मुळचा हंगेरीच्या बुडापेस्टचा ‘जोस बिरो’ पेशानं पत्रकार-चित्रकार असला तरी पेशीनं ‘संशोधक’ होता..
त्याकाळी फाऊंटन पेनची चलती होती..
मला तर आजही तेच आवडतात पण शाईचे डाग-दौत-निब आणि एकुण मेंटेनन्स यामुळं जोसच्या डोक्यात लवकर शाई सुकेल आणि डाग पडणार नाही अशी शाई असलेला पेन बनवायचं खुळ घुसलं..
‘जोस’ त्या कालावधीत हंगेरीत पत्रकार होता..
तिथं त्याला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे वर्तमानपत्रात वापरली जाणारी शाई लवकर सुकते आणि तिचे डागही पडत नाहीत..
मग जोसनं एक साधा प्रयोग केला..थेट फाऊंटन पेनमध्येच वर्तमानपत्रासाठी वापरली जाणारी शाई ओतली..प्रयोग भयंकर फसला..घनतेमुळं शाई निबपर्यंत पोहोचायला प्रचंड वेळ घेत होती-पोहोचली तरी अडकत होती..
‘च्यामारीऽऽ या फाऊंटन पेनच्याऽऽ’ जोस अस्वस्थ झाला पण निराश नाही..
“मी आणलेली शाई लवकर घेत नाहीस काय?” म्हणत त्यानं निबच बदलवायचं ठरवलं..
जोसनं निबवर एक बाॅल बसवला..कागदावर हा बाॅल ठेवत पेन हलवला की हा बाॅल फिरू लागायचा आणि फिरता फिरता हळूहळू शाईही खेचायचा..
युरेकाऽऽ जोसचा हा प्रयोग तर बऱ्यापैकी यशस्वी झाला होता..बाॅलवर तो प्रचंड खूष होता आता या बाॅलला साजेशी वेगळी शाई बनवण्याचं नवं खुळ त्याच्या डोक्यात घुसलं..
जोसच्या भावाचं मेडिकल होतं त्यालाही वेगवेगळी मुलद्रव्ये-संयुगं-रसायनं यांची बेसिक माहिती होती..
‘जोसचं खुळ आणि भावाचा वेळ’ यांची सांगड बरोब्बर बसली आणि या दोघांनी मिळून ‘बाॅल’ असलेल्या पेनासाठी परफेक्ट अशी शाई बनवली..
तारीख होती १५ जुलै १९३८ आणि या भावांनी पेटंट घेतलं ‘बिरो’ या नावानं..
पण आजुबाजूला सगळंच काही आलबेल होतं असं नाही..दुसऱ्या महायुद्धाचं रणशिंग फुंकलं गेलेलं होतं..
१९४० साली नाझींनी हंगेरी ताब्यात घेतलं..
जोसला परागंदा होण्याशिवाय पर्याय नव्हता..देश
सोडत तो अर्जेंटीनात दाखल झाला..
नविन देश,त्यात विस्थापिताचं जगणं..कुठला पत्रकार?कश्याचा चित्रकार? डोंबल्याचा संशोधक? अनेक प्रश्न उभे ठाकले..
रोजी-रोटी साठी काहीतरी करणं आवश्यक होतं..जोसनं
’बॉलपॉईंट पेन’चं मार्केटिंग सुरू केलं..त्याचे फायदे तो लोकांना सांगू लागला..
पहिलं ग्राहक मिळालं थेट ब्रिटनचा राॅयल एअर फोर्स विभाग..बल्क ऑर्डर मिळाली होती..जोस कामाला लागला..
त्यांना पेन प्रचंड आवडला..विशेषत: उंच आकाशातही हा पेन तोच परफाॅर्मन्स द्यायचा हे बघून ते खुश झाले..वाॅव..
त्यांनी जोसला पुढचा लाॅट बनवायला सांगितला..
ऑर्डर होती तब्बल तीस हजार पेनची..
१९४५ साली अमेरिकन बाजारपेठेत जेव्हा ‘बॉलपॉईंट पेन’ची पहिली बॅच दाखल झाली तेव्हा पेन विकत घ्यायला एवढी तोबा गर्दी झाली की ती कंट्रोल करण्यासाठी शेकडो पोलिसांचा ताफा तैनात करावा लागला..
जोसनं त्यानंतर कधी मागं वळून पाहिलं नाही..
आपल्याकडं थेट बाॅलपेन किंवा जगभरात अनेक ठिकाणी बाॅलपाॅईंट पेन म्हणून ओळख असली तरी अजूनही काही दर्दी लोकांत किंवा ब्रिटन-आयर्लँड-ऑस्ट्रेलिया-इटली यासारख्या देशात हा पेन आजही ‘बिरो’ नावानं ओळखला जातो..
अर्थात आज या बॉलपॉईंट पेनमध्ये अनेक बदल झाले-प्रयोग झाले..पेनाच्या निबमध्ये पितळ-स्टील-टंगस्टन कार्बाइड असे एक ना अनेक बदल झालेत..
या पेनानं अनेक स्थित्यंतरं पचवली..आज किपॅड-टचपॅड यांचा जमाना आला तरी ‘बॉलपॉईंट पेन’ ही वस्तू जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूपैकी एक आहे..
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कितीही महागाई वाढली तरी प्रत्येकाच्या खिश्याला परवडणारा बाॅलपाॅईंट पेन जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मिळतो हे विशेष..
‘पेरुचापापा’ मध्ये पहिला क्रमांक पटकवत ‘बॉलपॉइईंट पेन’ आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय भलेही फक्त स्वाक्षरीपुरता का असेना..
आज बाॅलपाईंट पेनाचा जन्मदाता ‘बिरो’ यांचा जन्मदिवस..
विनम्र अभिवादन..🖊 💐
Comments
Post a Comment